१०० शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर

0

दि.३१: १०० शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्या स्थानावर आहेत. इंडियन एक्सप्रेसकडून जाहीर करण्यात येणाऱ्या २०२२ मधल्या १०० शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येला कोरोना काळात नियमांचं पालन करण्यास भाग पाडण्यापासून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या विक्रमापर्यंत नरेंद्र मोदींनी देशातल्या राजकारणावर विविध मुद्द्यांच्या आधारे राज्य केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ९ व्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या यादीत १६ व्या क्रमांकावर आहेत.

पंतप्रधान मोदींच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तर चौथ्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत. तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर असून उद्योगपती गौतम अदानी सातव्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या क्रमांकावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या आणि देशाच्या अर्थंमंत्री निर्मला सीतारामण दहाव्या क्रमांकावर आहेत.

सर्वात कठीण आव्हानांमधून भाजपाच्या विरोधात उभे राहिलेल्या ममता बॅनर्जी २२ वरून ११ व्या क्रमांकावर आल्या आहेत. सरन्यायाधीश एन व्ही रमण १२ व्या क्रमांकावर आहेत. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना उद्धव ठाकरेंच्या करोना काळातल्या कामाचं कौतुक होत आहे.

शक्तिशाली भारतीयांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १६ व्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १७ व्या स्थानावर आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणून सत्तांतर घडवून आणणं, तसंच देशभरातल्या भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधणं यात शरद पवारांची प्रमुख भूमिका मानली जाते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here