Prakash Surve: आमदार प्रकाश सुर्वे यांनी शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.१५: शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्ध सुरू असताना या प्रकरणावर आमदार प्रकाश सुर्वे शांत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी मौन सोडलं असून प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी त्यांची बाजू मांडली.

हेही वाचा Sanjay Raut On Sheetal Mhatre: शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे व्हिडिओ प्रकरणात संजय राऊतांचा इशारा

प्रकाश सुर्वे काय म्हणाले? | Prakash Surve

“मी गेल्या महिन्याच्या १८ ते २६ फेब्रुवारीपर्यंत प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड रुग्णालयात दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने आणि सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही, असा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार केला जातो आहे”, अशी प्रतिक्रिया प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे.

“माझ्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या प्रेमामुळेच मी दोन वेळा निवडून आलो आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदार संघात जोमारे सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या धडाक्यामुळे स्वत: राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी व्हिडिओ मॉर्फ करून खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यातून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते”, असेही ते म्हणाले.

“११ मार्च रोजी लोकप्रकल्पाच्या उद्घाटनानंतर निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत प्रचंड गर्दी आणि प्रचंड आवाजात होता. यावेळी मला बहिणी समान असणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला काही सांगत असतानाचा व्हिडिओत चुकीचे गाणे लावून मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा प्रकार घडल्याचं दिसून येत आहे. यातून महिलांप्रती असलेली त्यांची मानसिकता दिसून येते”, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here