“…तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत” प्रकाश शेंडगे

0

मुंबई,दि.१६: छगन भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहे असे म्हणत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी इशारा दिला आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून एकीकडे मनोज जरांगे पाटील दौरा करत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. मंत्री छगन भुजबळही या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहे. शुक्रवारी याबाबतीत अंबड इथं ओबीसी समाजाचा मेळावा आहे. तत्पूर्वी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा संघटनांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.

…तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय

प्रकाश शेंडगे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी ज्यावेळी ओबीसींच्या बाजूने आवाज उठवला तेव्हापासून प्रस्थापित मराठा समाजाने खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका केली. इतकेच नाही तर एकही मराठा त्यांना मतदान देणार नाही अशी भाषा करू लागला. यापूर्वी असे कधी नव्हते. भुजबळांच्या मतदारसंघात केवळ मराठा नाही, तर दलित, धनगर, मुस्लीम इतर सर्व जातीची माणसे आहेत. मराठा नाही केले तरी बाकीचे मतदान करणार आहे. जर भुजबळांना पाडण्याची भाषा होत असेल तर राज्यात ओबीसी समाजही ६० टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात ओबीसी समाज आहे. जर तुम्ही एक भुजबळ पाडणार असाल तर ओबीसी तुमचे १६० आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.

तसेच जालनातील सभेत विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, महादेव जानकर सगळ्यांना बोलावले आहे. मोठ्या संख्येने याठिकाणी ओबीसी समाज एकवटणार आहे. ही ऐतिहासिक सभा होईल असं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं आहे. जालनाच्या अंबड तालुक्यात ओबीसी समाजाचा भव्य मेळावा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस घेत आहे.

सुरक्षेत वाढ

मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास विरोध करत सातत्याने प्रकाश शेंडगे समोर येऊन भूमिका मांडत आहेत. त्यामुळे त्यांना धमक्याही येत असल्याचे समोर आले आहे. अशातच सरकारने प्रकाश शेंडगेंच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शेडगेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पोलिसांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here