अमरावती,दि.६: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाशी जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे सांगितले. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते. वंचित आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची युती झालेली आहे. राज्यात ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. वंचितला अजूनही महाविकास आघाडीत घेतलेले नाही. तसेच राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीतही वंचितला घेतलेले नाही.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
आमची युती फक्त सेनेशी (ठाकरे गट) झालेली आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. सेनेचा आणि आमचा २४-२४ सीटचा फॉर्म्यूला ठरला आहे, असेही आंबेडकर म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्याचे आंबेडकर म्हणाले.
अमरावती शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीकरिता प्रकाश आंबेडकर शनिवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेपासून रोखण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढविणे गरजेचे आहे; परंतु काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी आहे, त्यामुळे त्यासंदर्भात जास्त काही बोलणार नाही. आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी झालेली आहे. त्यामुळे आमचे जे काही बोलणे आहे ते फक्त शिवसेनेशी आहे.