जालना,दि.५: Prakash Ambedkar On Maratha: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावर महत्वचे वक्तव्य केले आहे. मागील चार-पाच दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा देत हा लढा असाच सुरू ठेवा, असं सांगितलं.
मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचे महत्वाचे वक्तव्य | Prakash Ambedkar On Maratha
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी हा लढा सुरू ठेवण्यासाठी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. हा लढा एक दिवसाचा नसतो, हे आपण महात्मा गांधींपासून पाहत आलो आहे. स्वातंत्र्याचा लढाही अनेक दिवस चालला. ब्रिटनमध्ये जोपर्यंत चर्चिल सत्तेत राहतील तोपर्यंत भारताला स्वातंत्र मिळणार नाही, असं इंग्लंडमध्ये सांगितलं जात होतं. त्यानंतर चर्चिल हरले, आणि सत्तेत ॲटली आले. सत्तेत आल्यानंतर ॲटलींनी सांगितलं, आम्ही भारताला स्वातंत्र देऊ आणि भारताला स्वातंत्र मिळालं.”
“आपल्यालाही अशीच वाटचाल करावी लागेल. येथील व्यवस्थेला आणि न्यायालयालाही तुम्ही अंगावर घ्यायला, तुम्ही शिकलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही येथील व्यवस्थेला आणि न्यायालयाला अंगावर घ्याल, त्यादिवशी तुम्ही ज्या प्रश्नासाठी लढत आहात, तो प्रश्न मार्गी लागायला वेळ लागणार नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्यघटनेमध्ये असं कुठेही नमूद केलं नाही की… | Prakash Ambedkar
“राज्यघटनेमध्ये असं कुठेही नमूद केलं नाही की, अमूक समाजाला आरक्षण देता येणार नाही. कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की, एखाद्या समाजाला आम्ही आरक्षण देणार नाही, असं म्हटलं नाही. पण आरक्षण देताना संबंधित वर्गाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? हे सरकारने सिद्ध करावं. शासनाने तसं सिद्ध केलं, तर त्यांना आरक्षण देण्यात आमचा कुठेही हस्तक्षेप नसेल”, असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.