नागपूर,दि.२०: Prakash Ambedkar On BJP: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढल्याशिवाय भाजपाचा पराभव करणे अशक्य आहे. असा पराभव अपेक्षित असेल तर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेऊन जाण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांची आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? | Prakash Ambedkar On BJP
प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरातील रविभवन या शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांना महाविकास आघाडीतबाबत विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तुम्हाला महाविकास आघाडीत घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही त्यांच्यावर सोडून दिली आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. पटोले यांचे हे विधान म्हणजे आघाडीत बिघाडी दर्शवते. आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अहंकार थोडा कमी केल्यास भाजपाला पराभूत करणे सोपे आहे. परंतु काँग्रेस स्वत:ला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष मानण्याचा समंजसपणा दाखवेल असे दिसत नाही. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीत स्वागत असल्याचे म्हटले, पण जागा देऊ शकत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे आम्ही देखील सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आम्ही आमचा मार्ग आखत आहोत.
गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी ते काहीही करतील. त्यांनी आधीच शिवसेनेला कमकुवत केले आहे. आता त्यांचे लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडी आणि नाबार्डच्या अहवालाच्या आधावर नियंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. भारत जगात क्रमांक एकचा देश झाल्याचा दावा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार नाराज आहेत. त्यांनी त्यांची भारतातील गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्याचा परिणाम जुलैनंतर दिसू शकतो. भारतात आणखी महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सत्य देशाला सांगितले पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले.