जालना,दि.27: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरावाली सराटी येथे भेट घेऊन चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली आहे. मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत शेकडो अर्ज दाखल करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते. यामुळे निवडणूक आयोगासमोर अडचण निर्माण झाली असती.
अंतरावाली सराटी येथे 24 मार्चला मराठा समाजाशी मनोज जरांगे यांनी बैठक घेत चर्चा केली. शेकडो अर्ज भरण्याऐवजी एकच उमेदवार द्यावा असे ठरले आहे. त्यातही प्रत्येक जाती-धर्माचा उमेदवार द्यावा, असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला होता.
गावा-गावात मराठा समाजाची बैठक घेऊन समाजाची भूमिका सांगण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. यानंतर 30 मार्चला निर्णय घेवून असे जरांगे पाटील म्हणाले होते. मराठा समाज प्रत्येक जाती-धर्माचा उमेदवार देण्याची शक्यता असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे आंबेडकर म्हणाले.
मंगळवारी (दि.26) अंतरवाली सराटी येथे प्रकाश आंबेडकर यांनी 11:45 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा, लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.
सकारात्मक चर्चा
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीसह पुढील वाटचाल कशी करायची ? यासह इतर विषयांवर चर्चा झाली. संयुक्त निवडणूक लढायची का? यावर मात्र वेळ येईल त्यावेळी सांगू. आम्ही भेटलो म्हणजे सकारात्मक चर्चा झाली, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही आणि समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात हलके घ्यायचे नाही. वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. समाजाच्या म्हणण्यानुसार 30 तारखेला चित्रच स्पष्ट करू.