राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

0

मुंबई,दि.8: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आमदार अपात्र प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मोठा सल्ला दिला आहे. आंबेडकर यांचा सल्ला नार्वेकर यांनी मानल्यास ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी पर्यंत द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. डिसेंबर 2023 लाच निकाल लागणे अपेक्षित होते परंतू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदत वाढवून मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी 2024 पर्यंतची मुदतवाढ दिली होती.

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल 10 जानेवारीला लागणार आहे. बुधवारी 4 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजल्यानंतर निकालातील ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रसार माध्यमांशी प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार अपात्र प्रकरणावरून राहुल नार्वेकर यांना सल्ला दिला. प्रकाश आंबेडकर यांनी जुन्या प्रकरणाचा दाखला देत राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी असं म्हणेन की, राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की मी नाही देत निर्णय काय करायचं, ते करा. ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत नाहीत. तेव्हा त्यांनी सरळ म्हणावं की, मी निर्णय देत नाही, काय करायचं ते करा. कायद्याचं राज्य चाललं पाहिजे, हे बरोबर आहे. राहुल नार्वेकर निर्णय देत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे, हेही मी मान्य करतो. पण, राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत नाहीत. तेव्हा सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना स्वतःच्या ताब्यात घ्यायला बघतंय. यानिमित्ताने विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी सांगितलं पाहिजे की, मी देणार नाही. मला जेव्हा निर्णय द्यायचा आहे, तेव्हा देईन.” विधानसभा अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.

काय आहे सोमनाथ चॅटर्जी प्रकरण?

सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली होती. तेव्हा चॅटर्जी यांनी उलटा जवाब दिला होता, नोटीस पाठवणाऱ्यांना मी समन्स करतो. मला नोटीस बजावणारा लोकसभेत येत कसा नाही ते मी बघतो, असा इशाराच चॅटर्जी यांनी दिला होता. तेव्हा कुठे जाऊन लोकसभा अध्यक्ष विरुद्ध कोर्टाचं भांडण मिटलं. तेव्हा कोर्टाने चूक मान्य केली होती. स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही, असं कोर्टाने कबूल केलं होतं. नार्वेकर राज्याचे स्पीकर आहेत. सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे स्पीकर होते. पण दोघांचे अधिकार समान आहेत, असं सांगतानाच राहुल नार्वेकर यांना म्हणणे तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी व्हायची संधी मिळाली आहे. होऊन जा, असं आंबेडकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here