Politics Today: ‘देवेंद्र फडणवीसांच्या कानदुखीचं कारण खरं आहे, महाराष्ट्रात सध्या…’ संजय राऊत

0

मुंबई,दि.१४: Politics Today: शिंदे गटाच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवरून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात एका जाहिरातीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकांची पसंती असल्याचं एका सर्व्हेमधून समोर आल्याचा दावा करणारी जाहिरात प्रकाशित झाली होती. अनेक वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आल्यानंतर त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले. या जाहिरातीशी शिंदे गटाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. मात्र, दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचा तर्क यावरून मांडला जात आहे.

डॅमेज कंट्रोल जाहिरात
मंगळवारी ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आज शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. याशिवाय शिंदे गटातील सर्व मंत्र्यांचेही फोटो यात आहेत. त्याचबरोबर सर्वात वर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो असून दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत. दरम्यान, या जाहिरातीत मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला स्वतंत्रपणे मिळालेला कौल न दर्शवता एकत्रितपणे २९ टक्के जनतेचा कौल मिळाल्याचं नमूद केलं आहे.

जाहिरातीत तरी चित्र बदललेलं दिसत असलं, तरी… | Politics Today

दरम्यान, या जाहिरात नाट्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना त्यासंदर्भार ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. “जो बूंद से गई, वो हौदसे नहीं आएगी. त्यांच्या मनात काय आहे ते काल स्पष्ट झालं. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघे नाहीत, त्यांचे फडणवीसही नाहीत हे काल स्पष्ट झालं. पण काल फडणवीसांनी तंबी दिल्यामुळे आज किमान जाहिरातीत तरी चित्र बदललेलं दिसत असलं, तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही हे स्पष्ट दिसतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या कानदुखीचं कारण खरं आहे. महाराष्ट्रात सध्या…

“देवेंद्र फडणवीसांच्या कानदुखीचं कारण खरं आहे. महाराष्ट्रात सध्या वाहत असलेलं वारं कुणाच्या कानात शिरलं तर कान दुखतो. १०५ आमदारांच्या नेत्याचं या ४० जणांनी मातेरं आणि पोतेरं केलं आहे. त्यामुळे आज कान दुखणार. उद्या बऱ्याच गोष्टी दुखणार. पोटात दुखू शकतं, छातीत दुखू शकतं. या सरकारला हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसेल किंवा ते नाराज असतील तर त्यांची नाराजी समजून घेतली पाहिजे”, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी कोल्हापूर दौरा रद्द केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. या जाहिरात नाट्यामुळेच फडणवीस नाराज झाले असून त्यामुळेच त्यांनी कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द केल्याची चर्चा रंगली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत असल्यामुळे त्यांनी दौरा रद्द केल्याचं सांगण्यात आलं. यासंदर्भात संजय राऊतांनी टोला लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here