पुणे,दि.2: राष्ट्रवादी अजित पवार गटाने कर्जत येथे घेतलेल्या राज्यव्यापी शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप करत टीकास्त्र सोडलं. या टीकेला आज पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आज कोणी वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही आम्ही विचारांशी बांधलो गेलो आहोत, आम्ही संधीसाधू नाहीत, हे तुम्ही इथं येऊन दाखवून दिलंत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही कुणाच्या तिकिटावर निवडून आला, तुमची खूण काय होती, तुम्ही कोणाचा फोटो वापरला, तुमचा कार्यक्रम काय होता आणि आज तुम्ही कुठे गेलात? याचा विचार सामान्य माणूस करत असतो,” असं म्हणत शरद पवारांनी बंडखोर गटाला टोला लगावला.
अजित पवार यांनी काही गौप्यस्फोट केलेत त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं शरद पवार म्हणाले. पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती, भाजप बरोबर जायचं नव्हतं. भाजपसोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. भाजपसोबत जायचं नाही ही आमची भूमिका होती. ज्यांना जायचं होतं ते त्यांच्यासोबत गेले. मी त्यांना कधीच बोलावलं नाही, असं शरद पवार म्हणाले.
गौप्यस्फोटातील बाबी पहिल्यांदाच समजल्या
अजित पवार यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणाले, “त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. ज्या मागण्या केल्या होत्या त्या संबंधीची चर्चा झाली होती. मात्र तो रस्ता आम्हाला मान्य नव्हता. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची मतं मागितली नव्हती. जी आमची भूमिका होती त्याला लोकांचा पाठिंबा होता. त्यांनी निवडलेला रस्ता म्हणजे लोकांची फसवणूक आहे”.
प्रफुल पटेलांनी ईडीच्या कारवाईवर पुस्तक लिहावं
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपण लवकरच पुस्तक लिहून गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शरद पवार म्हणाले, पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. प्रफुल पटेलांकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं.ईडीच्या कारवाईवरही त्यांनी पुस्तक लिहावं.
पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झाला होता. भाजपबरोबर जायला नको ही स्पष्ट भूमिका होती. मला आनंद परांजपे किंवा जितेंद्र आव्हाडांची मदत घेण्याची गरज नाही. माझी स्वत:ची निर्णय घेण्याची कुवत आहे. लोकांच्या समोर जायचं असेल तर लोक जी भूमिका घेतील ती मान्य करावी लागेल. काहीही स्टेटमेंट केलं त्याचा स्वीकार मी का करायचा? त्यांनी राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, फक्त त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितलं. त्याच्याशी विसंगत भूमिका त्यांनी घेतली आहे.
कार्यकर्त्यांना खास संदेश
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली असली तरी शरद पवार मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आजच्या बैठकीत खास संदेश दिला आहे. “मला याआधीही काही आमदार सोडून गेले होते. तेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो आणि नवीन पीढी उभा केली. तेव्हा सोडून गेलेल्या ६० आमदारांपैकी ५१ ते ५२ जणांचा पराभव झाला होता. त्यामुळे आताही कोणी सोडून गेलं, याची चिंता करण्याची गरज नाही. कारण सामान्य लोकांमध्ये जाऊन जो आपली भूमिका मांडण्यात यशस्वी होतो, त्याच्यामागे लोक उभे राहतात. ती अवस्था पुन्हा एकदा नक्की महाराष्ट्रात पुन्हा बघायला मिळेल. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याशी याबाबत सविस्तरपणे बोलणार आहे. जे काही घडलं त्यामुळे आपली संघटना स्वच्छ व्हायला लागली आहे. तसंच नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.