मुंबई,दि.३१: Sanjay Raut On Sharad Pawar: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसह शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींसह कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शरद पवारांना केले जात आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार मुख्य ट्रस्टी दीपक टिळक यांच्या हस्ते दिला जाईल. राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु याबाबत रोहित टिळक यांनी शरद पवार हे या कार्यक्रमाला हजर राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यावरून आता महाविकास आघाडीतून प्रतिक्रिया येत आहेत.
संभ्रम करणारे निर्णय घेऊ नये | Sanjay Raut On Sharad Pawar
जनतेच्या मनात संभ्रम करणाऱ्या भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे आवाहन करत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून हे विधान केले असले तरी त्यांच्या विधानाचा संपूर्ण रोख हा शरद पवार यांच्या दिशेनेच आहे. पुण्यातील कार्यक्रमाला शरद पवार जाणार आहेत. या कार्यक्रमात मोदीही असणार आहेत, म्हणून संभ्रम निर्माण होणार असल्याचे राऊत यांना म्हणायचे असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. शरद पवार जर कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर देशात वेगळा संदेश जाईल, असे कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना भेटून सांगितले. शरद पवार कार्यक्रमाला जाण्यावर ठाम असल्याचा दावा करण्यात आला आहे.