मुंबई,दि.20: राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. याला कारणही तसेच आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला होता.
राज्यसभेसाठीही छगन भुजबळ इच्छुक होते, मात्र राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांना संधी मिळाली. तेव्हापासून भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेच त्यांनी मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असल्याचे विधान केले. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना अधिक पेव फुटले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार यांच्या गटातील अनेक नेते आणि आमदार लवकरच पक्षांतर करतील. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हे नेते निधी मिळवतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील, असा दावा त्यांनी केला.
केवळ भुजबळच पक्ष सोडतील असे मला वाटत नसून
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्या काय होणार याचा काही प्रमाणात अंदाज सर्वांनाच आला असेल. त्यामुळे केवळ भुजबळच पक्ष सोडतील असे मला वाटत नसून त्यांच्यासोबत अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदारही पक्ष सोडतील असा अंदाज सर्वांनाच आला आहे. हे लोक फक्त विधानसभेचे अधिवेशन होऊ देतील. अधिवेशनामध्ये निधी घेतील आणि त्यानंतर पक्षाला रामराम करतील असे मला वाटतं, असेही रोहित पवार म्हणाले.