Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप 

0

मुंबई,दि.18: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवताना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दुबई विमानतळावर भेट घेतली होती, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या भेटीला तत्कालीन केंद्र सरकारची परवानगी होती का, याचे जुने रेकॉर्ड जनतेसमोर आणावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा आरोप केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाले, शरद पवार 1988 ते 1991 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका परदेश दौऱ्यावर गेले होते. ते भारतातून लंडनला गेले. तेथून कॅलिफोर्नियाला त्यांनी 2 दिवस मुक्काम केला. तिथे त्यांनी एक बैठकही घेतली. ही बैठक कुणासोबत झाली? हे स्पष्ट झाले पाहिजे.

तिथून शरद पवार लंडनला आले. 2 दिवसांनी ते दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवरच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत भेट झाली, तिथे दाऊदने पवारांना सोन्याचा हार भेट दिला, तिथून संध्याकाळच्या विमानाने शरद पवार लंडनला आले आणि 2 दिवसांनी पुन्हा ते भारतात परतले. मुख्यमंत्री या नात्याने केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कुणीही परदेशात दौरा करू शकत नाही. 

त्यावेळच्या सरकारने शरद पवारांच्या दौऱ्याला मान्यता दिली होती का? कॅलिफोर्नियातील बैठक आणि दाऊदची भेट याला परवानगी केंद्राने दिली होती का, जर दिली होती तर त्या भेटीचा अहवाल केंद्राला सुपूर्द केला होता का..याचा खुलासा आताच्या केंद्र सरकारने केला पाहिजे अशी मागणी केली त्यांनी केली.

देशातील कोणताही मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय परदेश दौरा करू शकत नाही. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने शरद पवारांच्या दौऱ्याला मान्यता दिली होती का? कॅलिफोर्नियातील बैठक व दाऊदची भेट या दोन्ही घटनांना केंद्राची परवानगी होती का? दिली होती तर त्या भेटीचा अहवाल त्यांनी केंद्राला सुपूर्द केला होता का? याचा खुलासा विद्यमान केंद्र सरकारने केला पाहिजे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या मालिकेमुळे याचा खुलासा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here