देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया म्हणाले…

0

मुंबई,दि.३: देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी (२ ऑगस्ट) विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औरंगजेबवरील वादावरून प्रचंड गदारोळ झाला. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम युवकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर संबंधित तरुणांवर झालेल्या कारवाईवरुन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला. औरंगजेबचे स्टेटस ठेवलं म्हणून मुस्लीम तरुणांना अटक झाली, ते ठीक आहे. पण प्रकाश आंबेडकर औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहून आले. तसेच कुणाच्यात हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी दिलं. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. राज्यात दोन वेगवेगळ्या कायदा व्यवस्था आहेत का? असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला.

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस सभागृहात म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबच्या कबरीवर गेले होते, तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की, तुम्ही कबरीवर जाऊन महिमामंडन करू नका.दोन धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे, औरंगाजेबच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही. ज्याप्रकारे काही युवक व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे, असं लिहितात, तो गुन्हा आहे.” देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहातील उत्तरावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत गोलमाल उत्तर दिलं आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच देशात कुणाच्याही कबरीवर जाण्यास कायद्याने बंदी असेल किंवा कायद्याने बंदी नसेल, तर याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. त्यांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली.

प्रकाश आंबेडकर ट्वीटमध्ये म्हणाले, “काल (बुधवार, २ ऑगस्ट) महाराष्ट्राच्या विधानसभेत औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणं आणि व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवणं, यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं, ते गोलमाल उत्तर आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की, देशात कुणाच्याही मजारीवर किंवा कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा त्यांनी करावा. कुणाचं काय मत आहे? हा वेगळा भाग आहे. पण कबरीवर जाणं कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं किंवा कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही फडणवीसांनी खुलासा करावा.”

काय म्हणाले अबू आझमी?

अबू आझमी विधानसभेत म्हणाले, “काही मुस्लीम युवकांनी औरंगजेबाचे स्टेटस लावला, म्हणून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ते ठीक आहे. पण मी इथे विचारू इच्छित आहे की, प्रकाश आंबेडर यांनीही औरंगजेबच्या कबरीला भेट दिली आणि कबरीवर फुलं वाहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी कुणाच्या हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवावा, असं आव्हान दिलं. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या देशात दोन प्रकारची कायदा व्यवस्था आहे का? असा माझा सरकारला प्रश्न आहे. एखाद्याने स्टेटस ठेवलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो आणि एक व्यक्ती गुन्हा दाखल करून दाखवा, असं आव्हान देत आहे, तरीही तुम्ही कोणतीही कारवाई करत नाही.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here