नागपूर,दि.16:Nana Patole On MVA: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावर तसेच वज्रमूठ सभेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसून, केवळ प्राथमिक चर्चा झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा | Nana Patole On MVA
दरम्यान यावेळी बोलताना नाना पटोले यांनी लांबलेल्या महापालिका निवडणुकांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही सरकारकडे अनेकदा महापालिका निवडणुका घेण्याची मागणी केली. मात्र सरकारला लोकांच्या भावना माहिती आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपचं पानिपत होणार असल्यानं ते निवडणुकांपासून पळ काढत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी महापालिका निवडणुका गेल्या वर्षभरापासून प्रलंबित ठेवल्या आहेत हे लोकशाहीला पोषक आहे का असा सवालही उपस्थित केला आहे.
त्यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे, यावरून त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर काय कारवाई होत आहे हे माहिती नसल्याचं फडणवीस यांचं वक्तव्य बालिशपणाचा असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.