मुंबई,दि.२९: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील इशारा सभेत मोठी घोषणा केली होती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली होती. शनिवारी (दि.२३ डिसेंबर) मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा झाली. यावेळी राज्य सरकारला इशारा देत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून अंतरवली सराटी येथून मुंबईपर्यंत मोर्चा काढून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच या आंदोलनासाठी सुमारे ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आरक्षणासाठी मराठा समाजाकडून मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनासाठी मुंबईत येणारी वाहनं अडवू नयेत, अडवल्यास ती वाहनं गृहमंत्र्यांच्या दारात उभी करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.
त्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, गृहमंत्री वाहनं अडवणार नाहीत. वाहनं अडवली तर आम्ही सामान कसं न्यायचं. आम्हाला खाण्यापिण्याचं सामान, कपडे, इतर वस्तू लागणार आहेत. वाहनं अडवली तर कशा न्यायच्या, डोक्यावरून न्यायच्या का? आम्हाला तिथे राहुट्या नसतील तर उन थंडीपासून बचावासाठी ट्रॅक्टरमध्येच आसरा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ट्रॅक्टरबरोबर ट्रॉली लागणार आहे. ट्रॉलीमध्ये या वस्तू ठेवाव्या लागणार आहेत. पाऊस आला तर आमची त्या ट्रॉलीमध्येच झोपायची व्यवस्था होणार आहे.
तिथे आम्हाला कुणी घर देणार आहे का? दिलं तरी कोट्यवधी लोकांना जागा मावणार आहे का? मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडवणार असाल. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल, गाड्या, ट्रॅक्टर अडवून जप्ती आणणार असाल तर तुम्ही अडवा बघू कसे अडवता ते. एकाही ट्रॅक्टरवाल्याने घाबरण्याचं कारण नाही. कारण आपण ते दैनंदिन गरजा भावण्यासाठी नेणार आहोत. कोण ट्रॅक्टर अडवते ते बघूयाच. सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुणीही घाबरण्याचं कारण नाही. कुणाचाही ट्रॅक्टर जप्त होणार नाही. जर ट्रॅक्टर अडवलेच तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आम्ही सगळे जाऊन बसू. नागपूरच्या आणि मुंबईच्या त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलना बसू. देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच जाऊन बसायचं. करोडोंच्या संख्येने जाऊन बसायचं उठायचंच नाही. ट्रॅक्टर अडवाच तुम्ही. कसे गुन्हे दाखल करता, तेच बघूया, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाने गट-तट ठेवू नयेत. सर्वांनी एकत्र यावे हा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या भविष्याचा विषय आहे असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलकांना मोठ्या संख्येने मैदानांची आवश्यकता भासणार आहे त्यासाठी सर्वजण तयारी करत आहोत असे जरांगे यांनी सांगितले तसेच कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील आंदोलनाचा निर्णय रद्द करणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केले.