औरंगाबाद येथे राज ठाकरेंची नियोजित सभा; पोलिसांची मनसेला राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात सूचना

0

औरंगाबाद,दि.२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरें (Raj Thackeray) यांच्या सभेचे औरंगाबाद येथे १ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. मनसे कार्यकर्ते १ मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबाद येथे सभा घ्यावी याकरिता आग्रही आहेत. राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यानंतर या सभेसंदर्भातील तयारीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केलीय. असं असतानाच आता औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सुचवलं आहे.

नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास तारीख बदलण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आलीय. रमजानच्या आधी राज यांची सभा झाली आणि त्यांनी काही आवाहन केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत ही सभा रमजान ईदनंतर घ्यावी ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आलीय. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा शहरामधील गरवारे स्टेडियमवर घेण्यासंदर्भातील चाचपणी पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती समोर आलीय. पण मनसेचे पदाधिकारी याच मैदानामध्ये सभा घेण्याबद्दल आग्रही असल्याने तारीख बदलण्याची सूचना पोलिसांनी केलीय.

शहरामधील इतर ठिकाणांचीही चाचपणी केली जात असून पर्यायी ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज यांनी घोषणा केल्याप्रमाणा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही भव्य सभा घेतली जाईल यावर मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेण्यात यावी यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सभा नियोजित ठिकाणीच घ्यायची असेल तर तारीख बदला आणि सभा रमजान ईद नंतर घ्या किंवा सभेचं ठिकाण बदला अशी पोलिसांची भूमिका आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here