पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता

0

नवी दिल्ली,दि.15: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN) अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या (ग्रामीण) (PMAY-G) एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील मनकुंवारी बाई या आपल्या पतीसोबत शेतकाम करणाऱ्या  महिलेने पंतप्रधानांना सांगितले की ती बचत गटांमध्ये सहभागी होऊन डोना पट्टल तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहे आणि त्याचवेळी पीएम-जनमन संबंधित जनमन संगी यांसारख्या योजनांबाबत घरोघरी जाऊन प्रचाराच्या माध्यमातून जनजागृती देखील करत आहे. दीप समूह नावाच्या 12 सदस्यांच्या बचत गटाची ती सदस्य आहे. वन धन केंद्रांमध्ये बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करण्याचा तिचा विचार असल्याची माहिती देखील मनकुंवारी बाईने  पंतप्रधानांना दिली.

तिने पुढे बोलताना तिला मिळालेल्या लाभांविषयी सांगितले आणि पक्के घर, पाणी, गॅस आणि वीज जोडणी आणि आयुष्मान कार्डचा उल्लेख केला ज्यामधून तिच्या पतीला कानाच्या आजारासाठी आणि मुलीसाठी 30 हजार रुपयांचे उपचार मोफत मिळाल्याची माहिती दिली. वन अधिकार कायदा(FRA), किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान सन्मान निधी या योजनांशी संबंधित लाभ मिळत असल्याचे देखील तिने सांगितले. नळाने मिळणाऱ्या पाण्यामुळे तिचे रक्षण होत आहे आणि त्यामुळे तिचा आणि तिच्या कुटुंबाचा पाण्यातून होणाऱ्या आजारांपासून बचाव होत आहे, गॅस कनेक्शनमुंळे तिचा वेळ वाचत आहे आणि सरपणाच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुरापासून तिचे रक्षण होत आहे, अशी माहिती देखील  मनकुंवारीने    दिली. तिने पंतप्रधानांचे आभार मानले आणि म्हणाली, “ गेल्या 75 वर्षात जे काम हाती घेण्यात आले नव्हते ते आता 25 दिवसात पूर्ण झाले आहे.”

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी खेळांमधील रुचीबाबतही विचारणा केली आणि उपस्थित असलेल्या गर्दीतील तरुण महिला आणि मुलींना हात वर करून दाखवण्यास सांगितले. खेळांमध्ये सहभागी होण्यावर त्यांनी भर दिला आणि सांगितले की अलीकडच्या काळात आदिवासी समुदायाच्या खेऴाडूंनी खेळांमध्ये बहुतेक पदके पटकावली आहेत. मनकुंवारीला    विविध योजनांचे लाभ मिळत आहेत आणि त्यामुळे तिचे जीवन सुकर झाले आहे याबाबत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “ तुम्ही केवळ योजनांचे लाभच मिळवले नाहीत तर त्याबद्दल तुमच्या समुदायात जनजागृती देखील केली आहे”, ज्यावेळी लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा सरकारच्या योजनांचा प्रभाव कित्येक पटींनी वाढतो असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक लाभार्थ्याला सामावून घेण्याच्या आणि कोणालाही मागे राहू न देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार करत आपल्या संवादाचा समारोप केला.     

मध्य प्रदेशाताली शिवपुरी येथील सहारिया आदिवासी समुदायामधील ललिता आदिवासी ही तीन अपत्यांची माता असलेली महिला आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, पीएम किसान निधी या योजनांची लाभार्थी आहे. तिची मुलगी सहाव्या इयत्तेत आहे आणि तिला लाडली लक्ष्मी योजनेसोबत शिष्यवृत्ती, गणवेश आणि पुस्तके मिळत आहेत. तिचा मुलगा दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे आणि त्यालादेखील शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा मिळत आहेत. तिचा सर्वात लहान मुलगा अंगणवाडीत आहे. शीतला मैया स्वयम सहायता समूह या महिला बचत गटाची ती सदस्य आहे. तिला कस्टम हायरिंग सेंटरकडून पाठबळ दिले जात आहे. पक्क्या घराचा पहिला हप्ता मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचे अभिनंदन केले. आदिवासींच्या समस्यांचा इतक्या संवेदनशीलतेने विचार केल्याबद्दल ललिता यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि जनमन अभियानामुळे आदिवासी लोकांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडून येत आहे आणि उपलब्ध असलेल्या योजनांचे लाभ घेणे त्यांना शक्य होत आहे याची माहिती त्यांना दिली.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल आणि बिहू सणांचा उल्लेख करून देशातील उत्सवी वातावरणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. आजचा कार्यक्रम उत्सवी वातावरण अधिक उल्हसित करणारा असून लाभार्थ्यांशी झालेल्या संवादामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पक्की घरे बांधण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी थेट वर्ग होत असून त्याबद्दल या प्रसंगी त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले, “एकीकडे, अयोध्येत दिवाळी साजरी केली जात आहे, तर अत्यंत मागासलेल्या आदिवासी समाजातील 1 लाख लोक देखील दिवाळी साजरी करत आहेत.”

लाभार्थी यंदाची दिवाळी त्यांच्या हक्काच्या घरी साजरी करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा पावन प्रसंग नमूद करून, अशा ऐतिहासिक सोहळ्याचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्याच्या सन्मानार्थ त्यांनी केलेल्या 11 दिवसांच्या उपवास विधीत माता शबरीचे स्मरण होणे स्वाभाविक असल्याचे पंतप्रधान मोदींनी उद्धृत केले.

पीएम-जनमन अभियान

शेवटच्या टप्प्यावर असलेल्या शेवटच्या माणसाला सशक्त करण्याच्या अंत्योदयाच्या दृष्टीकोनाच्या  दिशेने पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, 15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त पीएम-जनमन अभियान हे विशेषत्वाने समस्याप्रवण आदिवासी समूहांच्या (पीव्हीटीजी) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी सुरू करण्यात आले.

पीएम-जनमन, अंदाजे 24,000 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह 9 मंत्रालयांद्वारे 11 महत्वाच्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते. सुरक्षित घरे, शुद्ध पेयजल आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार संपर्क सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधीं उपलब्ध करून देणे यांसारख्या सुविधा पुरवत पीव्हीटीजी कुटुंबे आणि वस्त्या मूलभूत सुविधांनी परिपूर्ण करून पीव्हीटीजीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे हे उद्दिष्ट आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here