नवी दिल्ली,दि.5: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मत मांडले. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विखुरलेल्या विरोधी इंडिया आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. आता काँग्रेसच्या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आलीय. काँग्रेसनं एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं, अशी टोलेबाजी पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केलीय. यावेळी त्यांनी कुटुंबवादावरुन काँग्रेसला घेरले. तसेच, पुढच्या निवडणूकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसली, असा टोलाही लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांनी दीर्घकाळ त्या बाकांवर(विरोधी बाकावर) राहण्याचा संकल्प केला आहे. आजकाल तुम्ही लोक (विरोधक) ज्या प्रकारे मेहनत करत आहात, जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. आज तुम्ही ज्या उंचीवर आहात, त्यापेक्षा जास्त उंचीवर तुम्ही नक्कीच पोहोचाल आणि पुढच्या निवडणुकीत प्रेक्षक गॅलरीत दिसाल. जसे तुम्ही अनेक दशके इथे बसला होता, आता अनेक दशके तिथे बसण्याचा तुमचा संकल्प जनता पूर्ण करेल, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी…
विरोधक किती काळ समाजात फूट पाडत राहणार आहेत. या लोकांनी देशाचे खूप तुकडे केले आहेत. निवडणुकीचे वर्ष आहे, थोडे कष्ट करूयात. देशासाठी काहीतरी नवीन करुया, मी तुम्हाला शिकवतो असा निशाणा पीएम मोदी यांनी विरोधकांवर साधला. काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली होती. यासाठी दहा वर्ष कमी नाहीत. पण यातही काँग्रेस सफल झालं नाही. जेव्हा ते स्वत: अपयशी ठरले त्यावेळी आपल्याच पक्षातील काही चांगल्या लोकांना त्यांनी दाबून टाकलं. त्यांचा उदय होऊ दिला नाही. एकप्रकारे त्यांनी स्वतःचे आणि विरोधकांचेही इतके मोठे नुकसान केलं. शिवाय संसद आणि लोकशाहीचं त्यांनी नुकसान केलं.
आमचं लक्ष आणि ध्येय खूप मोठी आहेत. आज संपूर्ण जग हे पाहात आहे. काँग्रेसच्या संथ गतीला तोड नाही. आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, त्याची कल्पनाही काँग्रेस सरकार करू शकत नाही. आम्ही गरीबांसाठी चार कोटी घरे बांधली. शहरी गरिबांसाठी 80 लाख पक्की घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे काँग्रेसच्या गतीने बांधली असती तर एवढे काम पूर्ण व्हायला 100 वर्षे लागली असती. पाच पिढ्या निघून जातील.