PM Modi: भारत महत्त्वाच्या भूमिकेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन साधणार पंतप्रधान मोदींशी संवाद

0

नवी दिल्ली,दि.२५: PM Modi: युक्रेनवर रशियाच्या (Russia Ukraine War) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमधील हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. मोदी म्हणाले की, मतभेद संवादातून सोडवता येतात. संभाषणादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित अलीकडच्या घडामोडींची माहिती दिली.

रशिया आणि युक्रेन वादात भारतही आता महत्त्वाच्या भूमिकेत येतोय. रशियानं युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर या संकटासंबंधी अमेरिका भारतासोबत संवाद साधणार, असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी गुरुवारी केलं. ते युक्रेन संकटावर आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हाईट हाऊस’मधील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘आम्ही भारताशी चर्चा (युक्रेन संकटाबाबत) करू’ असं वक्तव्य जो बायडेन यांनी यावेळी केलं.

रशियन हल्ल्यासंबंधी भारत पूर्णपणे अमेरिकेसोबत आहे का? असा प्रश्न बायडेन यांना विचारण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन संकटाबाबत भारत आणि अमेरिकेची भूमिका सारखीच नसल्याचं समजलं जातंय. भारताची रशियाशी जुनी आणि सुदृढ मैत्री आहे. सोबतच, गेल्या दीड दशकात अमेरिकेसोबतही भारताची धोरणात्मक भागीदारी अभूतपूर्व वेगानं वाढलीय.

युक्रेनला युद्धात हरएक प्रकारे मदत उपलब्ध करून देण्याच्या वल्गना करणाऱ्या अमेरिकेनं रशियाच्या हल्ल्यानंतर मात्र युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेनं रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केलीय. व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची निवड केली असली तरी रशियन जनतेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. ‘नाटो’च्या प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण केले जाईल या आपल्या वचनाचा बायडेन यांनी पुनरुच्चार केला असला तरी युक्रेनमध्ये अमेरिकेचं सैन्य तैनात केलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here