pm kisaan nidhi: जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी कॅम्पचे आयोजन

0

सोलापूर,दि.17: pm kisaan nidhi: कृषि व पदुम विभागाकडील शासन परिपत्रकानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे व अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसूल करणेबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित अर्जाच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी संबंधित शेतकन्यांना NIC मार्फत दूरध्वनीद्वारे message (संदेश) पाठवून अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याबाबत कळविण्यात येईल. तसेच डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी (दिनांक 25 मार्च 2022 रोजी) गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय नोडल अधिकारी (पी एम किसान) तथा निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली आहे.

या कॅम्पमध्ये लाभार्थ्यांनी 7/12 उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. लाभार्थ्यांची भौतिक तपासणी शेतकरी मित्रांमार्फत करण्यात येईल. यासाठी शेतकरी मित्रांची यादी कृषी विभागामार्फत तहसिल कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डाटा दुरुस्तीचे काम महसूल, कृषी व ग्राम विकास विभागांच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

या कॅम्पमध्येच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पोर्टवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची e KYC करण्यासाठी CSC केंद्राचे प्रतिनिधी कॅम्पस्थळी (ग्रामपंचायत कार्यालयामध्ये) उपस्थित राहतील. e KYC करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च, 2022 अशी आहे. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने e KYC प्रमाणिकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी प्रति बायोमॅट्रीक प्रमाणिकरण दर रु. 15 फक्त निश्चित करण्यात आला आहे. पी.एम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल- जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी e KYC प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आली आहे, असे श्रीमती पवार यांनी कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here