नवी दिल्ली,दि.31: Pew Study Research: प्यू रिसर्च सेंटरचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता आणि प्रभावाबाबत अहवाल जारी करण्यात आला आहे. दहापैकी आठ म्हणजेच 80 टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि अलिकडच्या काळात मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा जागतिक प्रभाव वाढल्याचा विश्वास 10 पैकी सात भारतीयांना आहे. G20 परिषदेपूर्वी मंगळवारी हा अहवाल जारी करण्यात आला.
प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल | Pew Study Research
सर्वेक्षणात जगभरातील लोकांचं भारताविषयीचं मत सामान्यत: सकारात्मक होतं, सरासरी 46 टक्के लोकांनी भारताबाबत अनुकूल मत व्यक्त केलं. तर 34 टक्के लोकांचं मत प्रतिकूल होतं. याशिवाय 16 टक्के लोकांनी कोणतंही मत व्यक्त केलं नाही.
हे सर्वेक्षण जगातील 24 देशांमध्ये 20 फेब्रुवारी पासून 22 मे दरम्यान करण्यात आल्याचं प्यू रिसर्च सेंटरने जारी केलेल्या अहवालात सांगितलं आहे. सर्वेक्षणादरम्यान 30861 लोकांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं जागतिक मत आणि इतर देशांबद्दल भारतीयांचं मत तपासण्यात आलं. प्यू रिसर्च सेंटरने भारतीयांनी आवडीनिवडी आणि नापसंतीबाबत सर्वेक्षणाच्या अहवालात माहिती दिली आहे.
लोकांची मोदींना पसंती
प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात परदेशातील भारतीयांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा विश्वास व्यक्त दाखवला आहे. दहापैकी आठ भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यापैकी बहुतेकांचा (55 टक्के) दृष्टिकोन ‘अत्यंत सकारात्मक’ आहे. मोदी 2014 पासून सत्तेत आहेत आणि पुढच्या निवडणुकीत तिसरी टर्म देखील तेच पंतप्रधान असावेत असं त्यांचं मत आहे. 2023 मध्ये केवळ 20 टक्के भारतीयांनी मोदींबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याशिवाय दहा पैकी सात भारतीयांना वाटतं की गेल्या काही वर्षात भारताचा प्रभाव अधिक मजबूत होत आहे. तर पाचपेक्षा कमी जणांना भारताचा प्रभाव कमकुवत झाल्याचं वाटतं.
नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे परदेशात भारताचा दर्जा उंचावला आहे हे बहुतांश भारतीय मान्य करतात. आंतरराष्ट्रीय प्रकरणात योग्य पावलं उचललण्यावरुन पंतप्रधानांवर 37 टक्के लोकांचा विश्वास आहे तर 40 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास नसल्याचं सांगितलं.
भारताचा प्रभाव वाढल्याचं 68 टक्के लोकांचं मत
जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना 68 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा प्रभाव वाढल्याचं सांगितलं. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात इस्रायलमधून आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या 73 टक्के लोकांचा भारतावर विश्वास आहे. दुसरीकडे भारतीयांचा अमेरिकेवरील विश्वास वाढला असला तरी रशियावरील विश्वास कमी झालेला नाही. 65 टक्के भारतीयांचं मत आहे की अमेरिकेची भूमिका भारताच्या हिताची आहे तर 57 टक्के लोक रशियाला भारताचा मित्र समजतात.