जालना,दि.३१: राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेली जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाइलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत, असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली.
गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला शांततेत लढा सुरू आहे; परंतु काही ठिकाणी होणारी जाळपोळ, उद्रेक पाहता थोडी शंका येत आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी हा लढा आहे. त्यामुळे जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
बहुतेक सत्ताधाऱ्यांतीलच लोक कार्यकर्त्यांच्या हाताने घरे जाळून घेताहेत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावतायत, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.
जाळपोळ करू नका
आपल्याला आरक्षण मिळणारच. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येईल. आपल्या दारात कोणीही यायचे नाही आणि त्यांच्या दारात आपण कशामुळे जातोय, असा सवाल करीत तुम्ही सत्ताधाऱ्यांचे असो किंवा सामान्य मराठा असोत, शांततेत आंदोलन करा, जाळपोळ करू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.