नवी दिल्ली,दि.१७: भारतात ओमिक्रॉनची (Omicron) रुग्णसंख्या वाढत आहे. ही देशासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) धोका वाढत चालला असून देशातील एकूण रुग्णसंख्या आता ८७ वर पोहचली आहे. (Omicron Variant In India) गुरुवारी एकाच दिवशी १४ नवीन रुग्णांची भर पडली असून दिल्लीत ४, गुजरातमध्ये १, तेलंगणमध्ये ४ आणि कर्नाटकमध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण असले तरी गुरुवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही.
कर्नाटकात गुरुवारी एकाच दिवशी ५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यात ४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. याबाबत आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर के. यांनी माहिती दिली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या १९ वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली असून अन्य एक ३३ वर्षीय बाधित व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून परतलेली आहे. नायजेरियातून आलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीलाही या संसर्गाची लागण झाली आहे. याशिवाय दिल्लीतून आलेल्या ७० वर्षीय महिलेला आणि ३६ वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉनने गाठले आहे, असे सुधाकर यांनी सांगितले.
तेलंगणमध्येही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. गुरुवारी हैदराबादमध्ये ४ नवीन ओमिक्रॉन बाधितांची भर पडली. त्यामुळे राज्यातील बाधितांची एकूण संख्या ६ झाली आहे. त्याआधी दुपारी दिल्लीत ४ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे दिल्लीतील ओमिक्रॉन बाधितांची संख्या दहा झाली तर गुजरातमधील वीजापूर येथे एका महिलेला ओमिक्रॉनची लागण झाली. या महिलेने कोणताही आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केलेला नाही. महिलेचा एक नातेवाईक झिम्बाब्वे येथून परतला होता व एका अंत्ययात्रेत त्याची भेट झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने या महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.