मोहरम सणानिमित्त निघणार 12 जुलैपासून मिरवणुका  

0

सोलापूर,दि.1: मोहरम कमिटी शहर सोलापूरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम राष्ट्रीय सणानिमित्त  12 ते 17 जुलैपर्यंत मिरवणुका काढण्यात येणार असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येत्या 7 जुलै रोजी चंद्रदर्शन पंजाची स्थापना आलावा ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 8 जुलै रोजी इस्लामी नूतन वर्षाची सुरुवात होणार असून 12 ते 17 जुलैपर्यंत सहा दिवस यौमी आशुरा शहाद- ए- इमाम हुसेन शानदार मिरवणुका निघणार आहेत. सुफी संतांच्या प्रेरणेने मोहरमचा राष्ट्रीय सण उत्साही वातावरणात शहरात साजरा करण्यात येणार आहे.

दरम्यान, शुक्रवार ,12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता मोहरमची पाचवी निमित्त बेगम पेठ सालार किराणा दुकान येथून पीर छोटे मुस्लिम पंजाची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता रंगा चौक येथून पीर बडे मुस्लिम मानाच्या पंजा मिरवणूक हिंदू-मुस्लिम भाविकांच्या समवेत निघणार आहे. यावेळी आमदार, माजी महापौर, पोलीस आयुक्त, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योगपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शनिवार ,13 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता दुर्वेश मस्जिद शनिवार पेठ येथून पीर छोटे अब्बास अली पंजाची धावती मिरवणूक शेकडो तरुण भाविकांसह निघणार आहे. शनिवार पेठ येथून पीर अली अजगर पंजाची मिरवणूक पारंपरिक मार्गावरून निघणार आहे. साखरपेठ येथून पीर बडे अब्बास अली मानाच्या पंजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

रविवार 14 जुलै रोजी मोहरमची सातवी निमित्त रात्री 9 वाजता मराठा वस्ती येथून पीर इमाम कासिम पंजाची मिरवणूक निघणार आहे. सोमवार 15 जुलै रोजी पीर छोटे मौलाली पंजाची मिरवणूक निघणार आहे. विजापूर वेस डॉ. झाकीर हुसेन चौक येथून रात्री 10 वाजता घोडेपीर पंजाची ताबूत निघेल. कुंभार वेस येथून पीर बडे मौलाली मुशकील कुशा पंजाची मिरवणूक रात्री  11 वाजता निघणार आहे.

तसेच बाळीवेस इथून पीर बडे अकबर अली पंजाची मिरवणूक रात्री बारा वाजता निघून मंगळवार पेठ पोलीस चौकी जवळ पीर मौलाली व पीर अकबर अली यांची पवित्र भेट होऊन तिन्ही पंजाची संयुक्त मिरवणूक धार्मिक परंपरेनुसार आसार शरीफ जाऊन भेट घेतील. शहरातील सर्व भागातून पीर मौलाली पंजाच्या मिरवणुका परंपरेनुसार व शासकीय नियमानुसार निघणार आहेत.

मंगळवार, 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता विठ्ठल मंदिर, बेगम पेठ मस्जिद लगत पीर हुसेन बाशा नाले हैदर इमामे हुसेन पंजाची मिरवणूक निघणार आहे. बेगम पेठ बडी बाणेकेरी तालीम येथून पीर बडे इमाम हुसेनी पंजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. विजापूर वेस कुरेश जमातीच्यावतीने पीर बारा इमाम पंजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे तर रात्री 11.30 वाजता पीर नालसाहेब पंजा मिरवणूक निघेल.

बुधवार,17 जुलै  रोजी पहाटे 4 वाजता शनिवार पेठ इकबाल क्लब दुर्वेश मशीद येथून पीर इमाम हुसेन पंजाची मिरवणूक मशालीसह निघणार आहे. सकाळी 7 वाजता इमामे कासीम पंजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघेल. त्यानंतर मंगळवेढा तालीम येथून इमामे हुसेन साहेबांचे पवित्र बहात्तर कुटुंब अहले हरम पंजाची मिरवणूक हजारो हिंदू बंधू भाविक, ज्येष्ठ पत्रकार एजाज मुजावर व परिवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून निघणार आहे. 

याच दिवशी दुपारी 2 वाजता शनिवार पेठ येथून पीर इमामे हुसेनची मिरवणूक निघेल. जिंदाशाह मदार चौक मुस्लिम पाच्छापेठ नूरानी मशीद येथून पीर बडे हुसेनी का अलम दुपारी 3 वाजता निघेल. दोन्ही भावांची प्रथम भेट मुस्लिम पाच्छा पेठ येथे होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बेगम पेठ मस्जिद बडी बाणेकरी तालीम येथे भेट होऊन दोन्ही तलवार पंजे मिळून भारतीय चौक हजरत हुसेनी दर्गाह पटांगण येथे हजारो हिंदू-मुस्लिम बंधू भगिनी भाविकांच्या उपस्थितीत दोन्ही पंजाची भेट होऊन पुष्पवृष्टी होणार असल्याचे अध्यक्ष मोहोळकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस शकील मौलवी, मुसा मुर्शद, अ. गफार गुडमिट्टे, अ. सत्तार चांदा, किरण सपार, शाह इकबाल दुर्वेश, म. रफिक मोहोळकर आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here