सोलापूर,दि.11: सोलापूर शहरात ओमिक्रॉनचा (Omicron patient was found in Solapur city) पहिला रूग्ण आढळला आहे. रुग्ण 27 डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. सोलापूरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच Omicron चा रुग्ण आढळला आहे.
रुग्णाचा अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. 30 डिसेंबर 202 रोजी त्याचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी दिली.
संबंधित रूग्ण हा 27 डिसेंबर 2021 रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर अश्विनी रूग्णालयात तो उपचार घेत होता. त्याचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला मुंबईला पाठविण्यात आले होते. त्यानंतर तेथून 2 जानेवारी 2022 रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या व्यक्तीच्या संपर्कातील एक व्यक्तीदेखील पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही आरोग्य अधिकारी बसवराज लोहरे यांनी सांगितले.
सदर व्यक्तीचा आयसोलेशनचा (Isolation) कालावधी संपला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा प्रसार होणार नाही. सुरूवातीच्या पहिल्या तीन दिवसातच त्याचा प्रसार होऊ शकतो. आता सदर व्यक्तीपासून कोणत्याही प्रकारचा प्रसार होण्याची शक्यता नसल्याचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी सांगितले. कोव्हिड नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे सोलापूरकरांनी नियमांचे पालन करावे. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी केले.