तीस हजारांची लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक जेरबंद

0

सोलापूर,दि.९: मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कार्यालयीन अधीक्षक बसवेश्वर महादेव स्वामी (वय ४५) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau) सोमवारी (दि.८) जेरबंद केले आहे.

पशुसंवर्धन विभागाचे सहायक प्रशासनाधिकारी स्वामी यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. हिंगणी निपाणी येथील सरपंचांनी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या शासनाच्या योजनेंतर्गत विविध विकासकामांच्या मंजुरीकरिता ग्रामसभेत ठराव मंजूर केला होता. त्यास अनुसरुन हिंगणी निपाणी गावातील विकासकामांचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे सादर केला होता.

हा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडून मंजूर होण्यासाठी तक्रारदार हे सरपंचांच्यावतीने पाठपुरावा करीत होते. त्यासाठी स्वामी यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सोमवारी समाजकल्याण सभापतींच्या कक्षामधील ॲन्टी चेंबरमध्ये ही रक्कम स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार कोष्टी, जानराव, पवार, सण्णके, किणगी, सुरवसे यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here