परभणी,दि.24: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवामुळे काही समर्थकांनी आत्महत्त्या केल्या. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत जातीय रंग पाहायला मिळाला. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एका तरुणाने पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर बंदची हाक देण्यात आली. जिंतूर शहरांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. इन्स्टाग्रामवर अभी तळेकर पाटील या इन्स्टाग्रामवर आयडीवरून मुंडे यांच्या विषयी अश्लील शब्दात पोस्ट केल्याचे रविवारी रात्री निदर्शनास आले.
आरोपीने इन्स्टाग्रामवर पंकजा मुंडे यांच्याविषयी अत्यंत अश्लील शब्दांत एक प्रतिक्रिया टाकली होती. आपल्या पोस्टमुळे भावना दुखावल्या जाणे तसेच दोन जातीमध्ये किंवा दोन गटात द्वेषाची भावना निर्माण होईल, याची कल्पना असताना देखील जाणीवपूर्वक इंस्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकण्यात आली. त्यामुळे, याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध परळीत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता सदरील युवकाला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. आता, संबंधित युवकाला परळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.