चुकीचे आणि व्देषपूर्ण राजकारण करणाऱ्या भाजपला धडा शिकविण्याची आता वेळ

0

मंद्रूप,दि.२: गेल्या दहा वर्षांपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची एकहाती सत्ता आहे. या माध्यमातून त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करणे अपेक्षित होते. मात्र विकासकामे न करता केवळ व्यक्ती व्देष आणि स्वार्थापायी न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना जाणूनबुजून त्यांनी सहकारातील दीपस्तंभ असणाऱ्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखानाची चिमणी पाडली आहे. त्यामुळे तीस हजार शेतकरी सभासद व कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे.

चुकीचे आणि व्देषपूर्ण राजकारण करणाऱ्या भाजपला धडा…

सिध्देश्वर परिवारातील इतर संस्थांनाही त्रास देऊन अडचणीत आणण्याचे काम ते करीत आहेत. सहकार चळवळ आणि संस्था मोडकळीस आणण्याचे काम भाजपचे नेतेमंडळी करीत आहेत. असे चुकीचे आणि व्देषपूर्ण राजकारण करणाऱ्या भाजपला धडा शिकविण्याची आता वेळ आली आहे. सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले.

हेही वाचा सत्ता नसताना देवेंद्र फडणवीस यांचे काय होते हे बघा

गुरूवारी, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी, बाळगी, सादेपूर, टाकळी, हत्तरसंग येथे आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत ते उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर इंडीचे आमदार यशवंतरायगौडा-पाटील, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, अशोक देवकते, सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक सिध्दाराम व्हनमाने, माजी संचालक बाळासाहेब बिराजदार, माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे,रामचंद्र अरवत, दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे, मल्लिकार्जुन नरोणे, महादेव नरोणे, मधुकर बिराजदार, शंकर टाकळी, सरपंच संगमेश बगले-पाटील, माजी सरपंच श्रीशैल पाटील, शिवानंद कलशेट्टी, तिपण्णा पाटील, बाबूराव बिराजदार,कमलाकर बिराजदार, शरणप्पा बिराजदार, बशीर शेतसंदी, संगप्पा ढंगापुरे, राजकुमार गायकवाड, माजी सरपंच गुरूनाथ कोट्टलगी, कुमार शिंदे,मल्लिकार्जुन जेऊरे, लक्ष्मण वागदरी, शिवगोंडा बगले, संगप्पा बगले, जगदेव बिज्जरगी, निलेश पाटील, अप्पासाहेब कोळी, सिध्दाराम घोडके, गुरुसिध्द बगले, गुरुसिध्दप्पा बिराजदार, हणमंत दिवटे, शरणप्पा दुधभाते, गुरुबाळप्पा पाटील, संजय गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी काडादी म्हणाले, गेल्या पन्नास वर्षापासून सिध्देश्वर कारखाना शेतकरी, सभासद व कामगार हित डोळयासमोर ठेवून काम करीत आहे. आजवर ऊसाला २७०० ते ३२०० पर्यंत उच्चांकी दर दिला आहे. शेतकरी, सभासद, कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविलेले आहेत. सिध्देश्वर कारखान्याने दिलेल्या उच्चांकी भावामुळे इतर खासगी कारखान्यांनाही ऊसदर वाढवावे लागत आहे. सिध्देश्वर कारखाना सुरळीत चालू असताना केवळ व्यक्ती व्देषापोटी तसेच ऊस पळवा-पळवासाठी विमानसेवेच्या नावाखाली पोलीस बळाचा वापर करून दहशत निर्माण करून कारखान्याची को-जनरेशची चिमणी भाजपने पाडली आहे. आज दहा महिने झाले तरी अजूनही विमानसेवा त्यांनी सुरू केली नाही.

चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासदांचे ऊस गाळपाविना राहू नये यासाठी जुन्या चिमणीवर कारखाना सुरू करण्याची आम्ही धडपड करीत होतो. मात्र जुन्या चिमणीही पाडण्याची मनसुबे त्यांनी आखले होते. मात्र संतप्त जनभावना व वातावरण पाहून त्यांनी पुढील पावले उचलली नाहीत. या सर्व संकटातून मार्ग काढून अखेर आम्ही कारखाना सुरू केला आहे आणि जिल्हातच उच्चांकी ऊसदर आम्ही जाहीर केला आहे.

भाजपचे लोकप्रतिनिधी मतदारसंघात विकास कामे करणे अपेक्षित असताना उलट सगळीकडे भांडणे लावत आहेत. बोरामणीचे आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांनी निधी दिला असता तर सहा महिन्यात विमानतळ पूर्ण झाले असते. मात्र त्यांना ते करायचे नाही. शेतकऱ्यांना चार पैसे ज्यादा मिळण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून इथेनॉल प्रकल्प चालू केला. मात्र, देशांतर्गत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे हे कारखान्यासाठी अडचणीचे ठरत आहे.

मोलॅसिस पडून आहेत. आम्ही नेहमीच शेतकरी हित जोपसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आमच्या संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न भाजपवाले करीत आहे. अशा भाजपला शेतकरी, सभासद, कामगारांच्या जीवनाशी काहीच देणेघेणे नाही त्यामुळे त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा आणि आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.

हुकूमशाही पध्दतीने राजकारभार

यावेळी आमदार पाटील म्हणाले, मोदी हुकूमशाही पध्दतीने राजकारभार करीत आहेत. ईडीचा गैरवापर सुरू आहे. सत्ता मिळाल्यावर भाजप केवळ जाती धर्माचे राजकारण करून देशात अशांतता निर्माण करीत आहेत. काँग्रेसची सत्ता असताना देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर होते. भाजपने अनेक सरकारी मालमत्ता उद्योगपतींना विकले आहेत. नवीन प्रकल्प सुरू करता येत नसेल तर चालू असलेल्या संस्था व प्रकल्पना तरी भाजपने अडचणीत आणू नये अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी सहकारी संस्थांना अडचणीत आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे.

याचेच उदाहरण म्हणजे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी केवळ व्यक्ती व्देषातून त्यांनी पाडली आहे. यामुळे हजारो शेतकरी, कामगाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, सभासद व कामगारांनी भाजपला या निवडणुकीत पाडावे. सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचा विकास केला आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही सोलापूर शहर मध्य’मध्ये चांगली कामे केली आहेत. सोलापूरच्या आणखीन विकासासाठी काँग्रेसला साथ द्यावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी राज्यमंत्री म्हेत्रे व संचालक शेळके म्हणाले, भाजपने देशात महागाई व बेरोजगारी वाढवली आणि जीएसटी लादून त्यांनी सर्वसामान्यांना जगणे मुश्किल केले आहे अशा भाजपला या निवडणुकीत जागा दाखवून देशात लोकशाहीचे पर्व कायम राहण्यासाठी काँग्रेसला निवडून द्यावेत असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन सिध्दाराम डोणगे यांनी करून आभार मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here