दि.24: केंद्रीयमंत्री स्मृती इराणींकडून (Smriti Irani) काँग्रेसच्या (Congress) तीन नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेसने (Congress) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणींची लेक झोईश इराणी ही मृत माणसाच्या नावावर लाय़सन घेऊन गोव्यात बार रेस्टॉरंट चालवित असल्याचा आरोप केला होता. तसेच यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. यामुळे इराणी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बारवरून स्मृती इराणींच्या मुलीवर काँग्रेसने केलेले आरोप आता कायदेशीर नोटिशीपर्यंत पोहोचले आहेत. आता स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेष, नीता डिसुजा यांच्यासह काँग्रेसला नोटीस बजावली आहे. माझ्या मुलीविरोधात खोटा आरोप केला जात असून लिखित स्वरुपात माफी मागावी. तसेच सर्व आरोप परत घ्यावेत, अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे.
“आपण सर्वांकडून आमच्या अशिलाची तसेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेची बदनामी केली जात आहे. आमच्या अशिलाच्या मुलीने कोणताही बार सुरु करण्यासाठी तसेच कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केलेला नाही. तसेच गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाकडूनही इराणी यांच्या मुलीला कोणतीही नोटीस आलेली नाही,” असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे.
या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना आमच्या अशिलाला (स्मृती इराणी) आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करायचे नाही, तर आमच्या अशिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायचे आहे. काँग्रेसचा आरोप आहे की त्यांची 18 वर्षांची मुलगी झोईश इराणी गोव्यात ‘सिली सॉल्स कॅफे अँड बार’ नावाचे रेस्टॉरंट चालवते. तिला गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
यूट्यूबवर ‘स्मृती इराणींचे मौन तोडा’ आणि ‘स्मृती इराणींच्या कौटुंबिक भ्रष्टाचाराची गाथा’ आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेला ‘हम अखबार भी चलते हैं बदनाम’ व्हिडिओ अशा शीर्षकांसह खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली आहे, बदनामीकारक, अपमानास्पद टिप्पणी करण्यात आल्याचे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.