एअर इंडिया विकली त्यावर कोणी बोलत नाही आणि एसटी बाबत मात्र आम्ही हटणार नाही अशी भूमिका : अजित पवार

0

अहमदनगर,दि.21: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजपावर टीका केली. एसटी कर्मचारी काही दिवसांपासून संपावर आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी प्रमुख मागणी कामगारांनी केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

‘एसटी संपावर (ST bus strike ) चर्चेने मार्ग निघतो, मात्र काही जण भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने एअर इंडिया (air india) ही विमानाची कंपनी विकली त्यावर कोणी बोलत नाही आणि ST बाबत मात्र आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही’ अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.

अहमदनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडले.

‘एसटी कर्मचारी संप करत आहे, आम्ही त्यांना समजावून सांगतोय, चर्चेतून मार्ग निघत असतो. पण काही जण एसटी कर्मचाऱ्यांना भडकावत आहे. तिथे जावून काही जण काहीही भाषण करत आहे. मंत्र्यांचा बाप काढत आहे. अरे आपली संस्कृती काय आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, सुसंस्कृत नेता कसा असावा हे जगाला त्यांच्या रुपाने कळले आहे. आता त्याच चव्हाण यांच्या महाराष्ट्रामध्ये काही तरी आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचे काम राजकीय नेते करत आहे’ असं म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला.

‘इथं एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्याची मागणी करत आहे. पण दुसरीकडे देशातली एअर इंडिया कंपनी ही देशाची होती, तिचे खासगीकरण करण्यात आले. तिथे कुणाचं काही ऐकलं नाही. हजारो लाखो लोकं कर्मचारी आहे, त्यांचा विचार केला नाही. त्यांचं खासगीकरण केलं, त्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही’ असंही अजित पवार म्हणाले.

‘जे काही दुटप्पी राजकारण सुरू आहे, आता ते कुठे तरी थांबले पाहिजे. माणसाच्या भल्यासाठी सांगतोय, एसटी कर्मचारी ही आपलीच माणसं आहे, त्याची मुलं, कुटुंब त्याच्या पगारावर अवलंबून आहे. हे आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे. सरकार हे समजत आहे, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा हे समजलं पाहिजे. आम्ही जे सांगतो ते झालंच पाहिजे असा हट्ट करून चालत नाही. दोन पाऊल सरकारने मागे घेतली पाहिजे, एक पाऊल तुम्ही पुढे आलं पाहिजे, असं करून एसटी संपावर तोडगा काढला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here