लसीकरणाशिवाय या ठिकाणी प्रवेश नाही ! आस्थापनांना होणार दंड, टाळेही ठोकणार

0

सोलापूर,दि.३०: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सापडलेल्या धोकादायक कोरोना विषाणुला (Omicron) रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार कडक उपाययोजना करण्यात येत असुन यापुढे कोरोना प्रतिबंधक लसींच्या (corona vaccine) दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच महापालिकेत प्रवेश मिळणार आहे.

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी विषाणूच्या नव्या घातक प्रकारामुळे सावधता बाळगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी लोक येत असतात. यापुढे अशा लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे लस घेतलेले प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास असेल त्यांनाच महापालिकेत प्रवेश मिळेल. पोलीस प्रशासनाच्या मदतीने महापालिकेचे आरोग्य विभाग प्रवेशद्वारावरच ही पाहणी करणार आहे, असेही पांडे यांनी सांगितले.

महापालिकेतील जवळपास सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले आहे. मध्यंतरी लस घेतल्याशिवाय वेतन देण्यात आले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. आणखी जे कर्मचारी राहिले असतील त्यांचेही लसीकरण तातडीने करुन घेतले जाईल. शहरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरु केली असुन नागरिकांना मोफत लस दिली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून घरापर्यंत लसीकरण ही मोहीम सुरु केली असल्याचे पांडे यांनी सांगितले.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा वा टॅक्सीमधून प्रवास, मॉल्स, व्यापारी संकुलांमध्ये प्रवेश तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी लसीकरण झालेले बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे कोरोना नियमांचे पालन केले नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्याबरोबरच अशांना प्रवेश देणाऱ्या आस्थापनांना ५०० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल तसेच टाळे ठोकण्यात येतील असेही पांडे यांनी स्पष्ट केले.
 
रेल्वे, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस, स्थानिक परिवहन सेवांच्या बसेसमध्ये केवळ लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच तिकीट असलेल्या किंवा नसलेल्या कोणताही कार्यक्रम, मेळावे, समारंभ, संमेलन, नाटय़प्रयोग, क्रीडा सामने अशा सर्व ठिकाणी तसेच दुकाने, मॉल, कार्यालयात केवळ लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश करता येईल. १८ र्वषखालील मुलांना महाविद्यालयीन किंवा अन्य ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणास्तव लस न घेतलेल्यांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश दिला जाईल. लसीकरण न झालेल्यांना आता अशा कोणत्याही ठिकाणी, कार्यक्रमात, सभेत, संमेलनांना बंदी घालण्यात आली आहे.

संपूर्ण खुल्या असलेल्या जागा – मैदानावर होणाऱ्या समारंभ, संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना प्रवेश दिला जाईल. तर चित्रपटगृह, नाटय़गृह, मंगल कार्यालये, सभागृहे आदी बंदिस्त ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांना प्रवेश देता येईल. मंगल कार्यालयांवरही बंधने लादण्यात आली आहेत असेही पांडे यांनी सांगितले.

काही लोक मास्क ऐवजी तोंडाला रुमाल बांधतात.यापुढे ते चालणार नाही. मास्कशिवाय कोठेही फिरता येणार नाही. तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल असेही उपायुक्त धनराज पांडे यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here