दि.४: लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यास भाजपा ५० जागांपर्यंत घसरेल असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले आहेत. अरुणाचल प्रदेश आणि मणिपुरात जेडीयूच्या आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. सर्व विरोधी पक्षांनी २०२४ मधील निवडणूक एकत्र लढवल्यास भाजपा ५० जागांपर्यंत घसरेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले आहेत. बिहारमध्ये भाजपाशी युती तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेसला सोबत घेत महागठबंधन सरकारची स्थापना केली आहे. तेव्हापासूनच पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदारीवरून नितीश कुमार यांचे नाव राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आहे.
पटणामध्ये जेडीयूच्या कार्यकारिणी बैठकीत नितीश कुमार यांनी विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. येत्या काळात विरोधकांच्या ऐक्यासाठी काम करण्याचा निर्धार या बैठकीत कुमार यांनी व्यक्त केला. देशात भाजपा सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी असल्याचा सूरही सर्व नेत्यांमध्ये उमटला. भाजपाविरोधात विरोधकांची आघाडी तयार करण्यासाठी लवकरच नितीश कुमार दिल्लीत विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत भेटीगाठी करणार आहेत. सोमवारपासून त्यांच्या या राजकीय दौऱ्याला सुरुवात होईल.
काही दिवसांपूर्वी मणिपुरातील जेडीयू आमदारांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षांतरावर देखील नितीश कुमार यांनी भाष्य केले आहे. “या आमदारांनी माझी बिहारमध्ये भेट घेतली होती. भाजपासोबत युती तोडल्याबाबत त्यावेळी ते आनंदी होते. इतर पक्षांमधून जिंकलेल्या आमदारांना भाजपा कशाप्रकारे फोडत आहे याची कल्पना करा” असे कुमार म्हणाले आहेत.
दरम्यान, बिहारमध्येही जेडीयू संपुष्टात येईल, असा दावा शनिवारी भाजपा खासदार आणि नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुशील कुमार मोदींनी केला आहे. “पोस्टरबाजी करुन कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही”, अशी टीका करत मोदी यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. “ज्या नेत्याकडे केवळ ५ ते १० खासदार आहेत, तो नेता पंतप्रधान कसा होऊ शकतो? नितीश कुमार यांना केवळ चर्चेत राहायचे आहे. आपण साधे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील होऊ शकत नाही, हे नितीश कुमार यांना माहित आहे”, असे मोदी म्हणाले होते.