मुंबई,दि.8: Nitin Gadkari: बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) उल्लेख करत नितीन गडकरी यांनी राज आणि उद्धव ठाकरेंसंदर्भात मोठा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनपेक्षित घटना घडल्या आहेत. वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले होते. एका वर्षापासून हे सरकार सुरळीत सुरू होते, पण अचानक एक मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. या सर्व घडामोडीदरम्यान, मुंबईत अनेक ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनर झळकत आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी? | Nitin Gadkari
झी मराठीवर अवधुत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ शो घेऊन आले आहेत. या शोमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हजेरी लावली. येत्या 9 तारखेला हा भाग रिलीज होणार आहे. या भागाचे काही प्रोमो समोर येत आहेत, अशाच एका प्रोमोमध्ये नितीन गडकरी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची इच्छा बोलून अपूर्ण राहिल्याचे सांगितले.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, बाळासाहेबांचे माझ्यावर आणि माझे बाळासाहेबांवर खूप प्रेम होते. बाळासाहेब त्यांच्या अखेरच्या दिवसांत होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होतो. त्यावेळेस त्यांनी सर्वांना बाहेर जायलं सांगितलं आणि मला एकट्यात शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मला राज आणि उद्दव यांना एकत्र करण्यास सांगितले. राजकारण एका बाजुला, पण एक कुटुंब म्हणून एकत्र असल्यावर ताकत वाढत असते. बाळासाहेबांची ती इच्छा अद्याप अपूर्ण राहिली आहे, असा गौप्यस्फोट गडकरींनी केला.
याच कार्यक्रमात नितीन गडकरींनी राज्यातील परिस्थितीवरही भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा ही खरेतर देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी 18 वर्षे विधिमंडळात होतो, कठोर टीका करायचो पण व्यक्तिगत मैत्री होती. थोडेसे आता जास्त झाल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय. याला खरे कारण नेत्यांपेक्षा मीडियाच कारणीभूत आहे.