मुंबई,दि.२७: भाजपा आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विट करत मागणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. यानंतर वाद-विवाद सुरु असून भाजपा नेत्यांकडून अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल ही मागणी करत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा असं म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विटरला २०० रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला फोटो शेअर केला आहे. ‘हे योग्य आहे’ असंही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
“एक नागरिक म्हणून ही माझी वैयक्तिक मागणी असून, पक्षाची भूमिका नाही. एक शिवप्रेमी म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना जगभरात मान्यता आहे. केंद्र सरकार काही विचार करत असेल तर अशा महापुरुषाचा फोटो तिथे छापणं योग्य ठरेल. ट्विटरच्या माध्यमातून माझ्या याच भावना मी मांडल्या आहेत,” असं नितेश राणेंनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.
पुढे ते म्हणाले “सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली तेव्हा आपल्याही मनात काही भावना निर्माण होतात. नोटांचा विषय ट्रेंड होत असल्याने मी माझ्या भावना व्यक्त केल्या”.
यासंबंधी तुम्ही वरिष्ठ पातळीवर काही पत्र देणार आहात का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “नक्कीच आहे…जर केंद्र सरकार असा काही विचार करत असेल तर मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करेन. तशी काही शक्यता असल्यास महाराजांचा फोटो नोटांवर आला तर त्यापेक्षा मोठा अभिमान असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही महाराजांबद्दल आदर आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन मी याबाबत अधिक माहिती घेईन”.
अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले आहे. यासंबंधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आल्याचं सांगितलं. अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झाली असून, कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तरच प्रयत्नांना यश मिळतं सांगत हा सल्ला दिला.