नवी दिल्ली,दि.४: देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच देशात ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने नवीन मार्गदर्शक सूचना ( new covid 19 guidelines ) जारी केल्या आहेत. संसर्ग अधिक पसरू नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी ३१ जानेवारीपर्यंत निलंबित केली आहे.
केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचार्यांना त्यांची हजेरी मॅन्युअली भरण्यास सांगितली आहे. कर्मचाऱ्यांनी आपली हजेरी रजिस्टरमध्ये भरावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
‘खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मंत्रालयांमधील आधार-आधारित बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये बायोमेट्रिक हजेरीची नोंदणी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारचे विभाग, त्यांच्याशी संलग्न आणि अंतर्गत कार्यालयांमधील हजेरी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित केली आहे’, कार्मिक विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही ५० टक्केच ठेवावी. इतर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. तसंच कर्मचाऱ्यांची कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी विभागांनी वेळापत्रक बनवावे. कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या वेळा या सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० आणि सकाळी १० ते संध्याकाळी ६.३० अशा ठेवाव्यात. तसंच कन्टेंमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावू नये. यासोबत दिव्यांग आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात न बोलावण्याची सूचना दिली गेली. सर्व सचिव आणि वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांनी मात्र कार्यालयात नियमित हजेरी लावावी, अशी सूचना दिली गेली आहे.
सर्व कर्मचाऱ्यांनी कायम मास्क घालावेत आणि कोविड-योग्य वर्तनाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना सर्व विभागाच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत, असे मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.