हुबळी,दि.23: नेहा मर्डर केस: कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्याकांडावरून जोरदार राजकारण सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हुबळी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांना फोन करून माफी मागितली आहे. या प्रकरणामुळे खूप दु:ख झाल्याचे त्यांनी फोनवर सांगितले. ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. यानंतर निरंजन यांनी आपली चूक झाल्याचे सांगितले. त्यांनी सरकार आणि पोलिसांची माफी मागितली.
मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृत नेहाच्या वडिलांना फोनवरून सांगितले की, “निरंजन… मला खूप खेद आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. हा गंभीर गुन्हा आहे. विशेष न्यायालय स्थापन करून आम्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊ.” वास्तविक, यापूर्वी सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाला वैयक्तिक शत्रुत्व म्हटले होते. त्यांनी हा लव्ह जिहाद असल्याचा इन्कार केला होता. तर भाजप याला लव्ह जिहादचे प्रकरण म्हणत आहे. इतकंच नाही तर अनेक हिंदू संघटना नेहाच्या वडिलांना भेटून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत.
नेहा हिरेमठचे वडील निरंजन हिरेमठ हे हुबळी-धारवाड महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक आहेत. राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनीच निरंजन आणि सिद्धरामय्या यांचे फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सीआयडी तपास आणि विशेष न्यायालय स्थापनेबाबत माहिती दिली. यानंतर निरंजन यांनी सिद्धरामय्या यांचे कुटुंबातील हितचिंतक आणि समाजाच्या वतीने आभार मानले. यासोबतच या प्रकरणी लवकरात लवकर आदेश निघावा आणि आम्हाला न्याय मिळावा, असेही ते म्हणाले.