लातूर दि.३०: औसा तालुक्यातील किल्लारी येथील ८ व ९व्या फेरीतील घरे वाटपासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावला जाईल असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ उर्वरित कबाला वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणेबाबत त्यांनी सूचना केली. तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या इतर विषयांबाबत देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यासोबतच भूकंप पुनर्वसनासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना वाणिज्य वापरासाठी भूखंड वाटप करण्याबाबत दिनांक ०७/०७/२०१४ रोजी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी सदर भूखंडाचे वाटप करण्यात यावे असे सांगितले होते त्यानुसार त्यानिर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. यासोबतच लातूर व धाराशिव जिल्ह्यातील ‘क’ वर्गवारीच्या गावातील भोगावट्यातील शासकिय व खाजगी जमिनीवर भूकंपानंतरन वसलेली सर्व घरे नियमित करून या लाभार्थ्यांना मालकी हक्क देऊन आठ वितरित करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
काल शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये त्यांनी भूकंपग्रस्त गावांतील सद्यस्थितीचा आढावा घेऊन सूचना केल्या.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, भुकंपग्रस्त भागातील लोक कुठे राहतंय त्याची यादी करा. ज्यांना अद्याप घर मिळालं नाही अशांची स्वतंत्र यादी बनवावी तसेच गावातील अंतर्गत रस्ते बनवण्यात यावेत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
अपहरणातून सुटका झालेल्या मुलींची सुरक्षा करणे महत्वाचे आहे त्याकरिता महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून त्यांना साहाय्य करून त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच ज्या निराधार विधवा महिला आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उपाययोजना करावी. बालविवाह अजूनही होताना दिसतात त्याकरिता स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करावा. कौशल्य विकासच्या माध्यमातून महिलांचा विकास घडवण्यावर भर द्यावा, किल्लारी येथील स्मृतिस्मारकाची जागा आणखी रुंद करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता लवकर जागा निश्चित करण्यात यावी अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली.
याप्रसंगी, आमदार अभिमन्यू पवार, आमदार ज्ञानेश्वर चौगुले, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, धाराशिव जिल्हाधिकारी सचिन ओंबासे (दृकश्राव्य माध्यमाद्वारे), पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , निवासी उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, कल्पना क्षीरसागर डेप्युटी सिओ, उपविभागीय अधिकारी निलंगा शोभादेवी जाधव उपस्थित होते.