नवी दिल्ली,दि.5: NDA Meeting: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी बुधवारी मित्रपक्षांसोबत बैठक घेतली. एनडीएच्या बैठकीला उपस्थित असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सरकार स्थापनेत विलंब होता कामा नये. आपण लवकरात लवकर सरकार स्थापन केले पाहिजे.
हे नेते होते एनडीएच्या बैठकीत | NDA Meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, एच.डी. कुमारस्वामी, चिराग पासवान, जितन राम मांझी, पवन कल्याण यांचा समावेश होता. याशिवाय सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रफुल्ल पटेल, प्रमोद बोरो, अतुल बोरा, इंद्र हंग सुब्बा, सुदेश महातो, राजीव रंजन सिंग आणि संजय झा यांनी सहभाग घेतला.
बुधवारी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान LKM येथे एनडीएची बैठक झाली. बैठकीला उपस्थित असलेले नेते संध्याकाळी 7:45 वाजता राष्ट्रपतींची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील.
आज पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांनी मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकारचा कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांना आणि मंत्रिमंडळाला पदावर राहण्यास सांगितले.