राष्ट्रवादीचे नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती : मोहित भारतीय

0

मुंबई,दि.6: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या एकूण 22 संपत्ती आहे, असा गौप्यस्फोट करतानाच भंगारवाला करोडपती कसा झाला? असा सवाल भाजप नेते मोहित भारतीय (कंबोज) यांनी केला आहे.

मोहित भारतीय आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं भारतीय म्हणाले.

आज नवाब मलिक यांची मी सगळी पोलखोल करणार आहे. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. उत्तरे देण्याचीही त्यांची लायकी उरलेली नसेल, असं सांगतानाच राज्यात सलीम-जावेदने चित्रपट सुरू केला होता. त्याचा द एन्ड मीच करणार. आज सलीम-जावेदच्या चित्रपटाची खरी स्क्रिप्ट आणि खरा चेहरा जगासमोर येणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

हॉटेल हे लोकांसाठीच असते. चहापाणी घेण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी लोक हॉटेलात जात असतात. नवाब मलिक कधी फाईव्ह स्टार हॉटेलला गेलेच नाहीत का? त्यांनी जनतेला फिरवण्याचं आणि दिशाभूल करण्याचं काम बंद करावं. नटबोल्ट कुणाचं ढिल्लं होणार आणि कोण पाणी पाणी होईल हे आज त्यांना कळेलच, असंही ते म्हणाले.

मलिक यांनी आमच्यावर 100 आरोप केले. पण एकाही आरोपावर पुरावा दिला नाही. ते खासगी त्रासाचा सूड उगवत नाही का? त्यांचे नॅरेटिव्हज सर्व खोटे आहेत. असं राजकारण यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले. माझ्या कुटुंबावर आरोप होत होते. तेव्हा भाजपने मला साथ दिली, असंही त्यांनी सांगितलं.

आता एनसीबीने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे कुणावरही आरोप होणार नाही. नॅशनल, इंटरनॅशनल अशा सर्व अंगानी आता तपास होईल. आता नवे अधिकारी तपास करणार आहेत. त्यांचंही बर्थ आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्याचं काम होईल, असा टोलाही त्यांनी मलिक यांना लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here