भाजपा नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे दाखवा आणि लाख रुपये मिळवा

0

औरंगाबाद,दि.१: भारतीय जनता पार्टी ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप अनेकवेळा करण्यात आला आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही अशा ठिकाणी भाजपा ईडीचा वापर करून सत्तांतर घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. ज्या नेत्यांवर कारवाई सुरू झाली असे नेते भाजपात गेल्यानंतर त्यांची चौकशी बंद होते.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर पुन्हा एकदा ईडीकडून केवळ विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. यातच औरंगाबादमध्ये आता अनोखे बॅनर झळकले आहेत. भाजपा नेत्यांवर ईडीची कारवाई झाल्याचे दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर औरंगाबादच्या चौकाचौकात लावण्यात आले आहेत. 

“भाजपा नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा”, असं बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांच्यावतीनं हे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर अक्षय पाटील यांचा मोबाइल क्रमांक देखील देण्यात आला आहे. भाजपा नेत्यांवर किंवा भाजपात गेलेल्यांवर ईडी तसंच इतर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई केली जात नाही असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून औरंगाबादेत हे बॅनर लावण्यात आले आहेत. 

“देशात कधी नव्हे ते ऐतिहासिक बहुमतानं भाजपाचं सरकार आलं. एवढंच नाही तर अनेक राज्यांमध्ये भाजपा आणि मित्र पक्षांचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नाही म्हणून सातत्यानं ते केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. आज देशात केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या घरगड्यासारख्या वागत आहेत. ईडी ही भाजपाची दुसरी शाखाच झाली आहे. या गोष्टीला कंटाळून औरंगाबादमध्ये बॅनर लावून १ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्याचं ठरवलं आहे. ज्या कुणी भाजपा नेत्यावर किंवा भाजपात गेलेल्या नेत्यावर कारवाई केल्याचं जो कुणी नागरिक दाखवून देईल त्याला मी १ लाख रुपये देण्याचं ठरवलं आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन १ लाख रुपये जिंकण्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी तरी प्रयत्न करावा असं माझं खुलं आव्हान आहे”, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here