‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका

0

दि.२३: राष्ट्रवादीने (NCP) फोटो ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक फोटो ट्वीट करण्यात आला असून त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ सिंदे आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला असून त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. “तो फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. आम्ही त्यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत”, अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

“कदाचित राज्याचे मुख्यमंत्री गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यग्र असल्यामुळे राज्यातील इतर लोकांचं काम पाहण्याची जबाबदारी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिली आहे, असं आम्हाला वाटतं. राज्याचा कारभार नेमका कोण पाहतंय? हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय, तो ते करतोय”, असंही रविकांत वरपे म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे. त्याच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सगळ्यांनीच ठेवायचा असतो.तुम्हाला इतर शासकीय भेटीगाठी किंवा अनौपचारिक भेटी घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून तुम्ही त्या घ्या. ती महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे”, असंही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कमी आणि गणपती मंडळांना जास्त भेटी देत आहेत. राज्यात इतर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here