राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आमदार तानाजी सावंत यांना उत्तर

0

दि.२९: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना उत्तर दिले आहे. सोलापूरात शिवसेना आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत टीका केली. निधी वाटपावरून महाविकास आघाडीत खदखद कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. एवढच नाही तर “आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय.” असंही तानाजी सावंत यांनी बोलून दाखवलं आहे. सोमवारी सोलापूरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित युवासेना मेळाव्यात सावंत बोलत होते.

आमदार तानाजी सावंत यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांना दडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत फेरविचार करायला हवा, असे परखड मत तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान प्रसारमाध्यमांनी अमोल मिटकरी यांना तानाजी सावंत यांच्या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “तानाजी सावंत म्हणजे पक्षप्रमुखांचं मत आहे असं नाही. त्यांच्याच पक्षाचे आमदार सुनील बांगर यांनी अजित पवारांनी ७५० कोटींचा निधी दिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे एखादा आमदार बोलतोय म्हणजे ती शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे असं वाटत नाही. त्यांची काय घालमेल काय सुरु आहे माहिती नाही पण महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे. उद्धव ठाकरे हे बोलणं फार गांभीर्याने घेत असतील असं वाटत नाही”.

तानाजी सावंत यांनी आघाडीतून बाहेर पडण्यासंबंधी विचार करावा असं उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय भाजपासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा? जर भाजपा पक्ष प्रमुखाच्या घरापर्यंत जाणार असेल, तर पक्षप्रमुखांनाही माहिती आहे की, महाराष्ट्र शाबूत ठेवायचा असेल, टिकवून ठेवायचा असेल तर भाजपापासून महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंत यांना समज देतील”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here