मुंबई,दि.२०: NCP MLA Amol Mitkari: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केले आहे. विधान परिषदेमध्ये भाजपानंतर सर्वांत मोठा पक्ष शिवसेनेचा (ठाकरे गटाचा) असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे आहे. परंतु, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी होऊन राष्ट्रवादीच्या संख्येप्रमाणे झाली आहे. परिणामी अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात आले आहे. हे पद आता राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार होते. दरम्यान, कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ आमदार आहेत.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले… | NCP MLA Amol Mitkari
सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे. परंतु मनिषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचं विधान परिषदेतलं संख्याबळ कमी झालं आहे. दरम्यान, अंबादास दानवे यांच्याकडे असलेले विरोधी पक्षनेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
“दानवे साहेबांचा अभ्यास कमी आहे असं मी म्हटलेलं नाही. जर महाविकास आघाडीने ठरवलं की विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ शिवसेनेचे ९ आमदार आहेत. त्यापैकी अभ्यासू रामराजे निंबाळकर, अनिल परब आहेत. तर आमच्याकडून (राष्ट्रवादी) एकनाथ खडसे आहेत. भाजपाला वेठीस धरायचं असेल तर, भाजपाची कोंडी करायची असेल तर सध्या अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून खडसेंकडे पाहायला पाहिजे. दानवे सुद्धा अभ्यासूच आहेत. परंतु, माझ्यासारख्याची ती भावना आहे”, असं अमोल मिटकरी म्हणाले.