मुंबई,दि.7: NCP Crisis: खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्हीच दावा सांगितला आहे. 30 जूनलाच आम्ही निवडणूक आयोगात आम्ही याचिका दाखल केली आहे. आमच्या याचिकेचा निपटारा होईपर्यंत कुणीही आमच्यावर कारवाई करु शकत नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. आम्ही अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून नेमलं आहे आणि त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी घेतलेली बैठक हीच अनधिकृत ठरवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel)यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस कसे आहोत? आणि पक्षाच्या संविधानानुसार आम्ही प्रक्रिया कशी पार पाडली याची माहिती दिली. शपथविधीच्या दोन दिवस आधी म्हणजेच 30 जूनला आम्ही पक्षाची बैठक घेतल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.
NCP Crisis: काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
‘खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. लोकांपर्यंत सत्य परिस्थिती यायला पाहिजे म्हणून समोर आलो आहोत. 30 जून 2023 ला राष्ट्रवादी पक्षाची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक लोक उपस्थित होते. ही बैठक देवगिरीला झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप आमदार तिथे उपस्थित होते. दोन्ही सदनाचे होते. राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते. 30 तारखेच्या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते अजित पवार यांना आपला नेता म्हणून तिथे निवडलं. त्यामुळे अजित पवारांनी पुढची प्रक्रिया केली’, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.
‘अजितदादांनी प्रफुल पटेल यांना म्हणजेच मला नॅशनल वर्किंग प्रेसिडंट केलं. यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आणि आपण विधीमंडळ पक्ष नेते आहोत असं सूचित केलं. प्रतोद म्हणून अनिल भाईदास पाटील यांना नियुक्त केलं. विधानपरिषद सभापतींनाही आम्ही कळवलं की अमोल मिटकरी विधानपरिषदेचे प्रतोद नियुक्त केलं आहे’, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात नऊ आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्याला काही अर्थ नाही. राजकीय पक्ष कोण? हे निवडणूक आयोग ठरवू शकतो. आमच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या कारवाईला काहीही अर्थ नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तसंच मूळ राष्ट्रवादी पक्ष आम्हीच आहोत कारण आमच्याकडे आमदारांचं जास्त बळ आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. 30 तारखेला प्रतिज्ञापत्रासह सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. निवडणूक आयोग आता त्यावर निर्णय घेणार आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
‘बैठकीनंतर त्याच दिवशी आम्ही आमदार आणि इतर मान्यवरांचं प्रतिज्ञापत्र (ऍफिडेविट) निवडणूक आयोगाला दिलं आणि याचिका दाखल केली. निवडणूक आयोग आणि स्पीकरपर्यंत हा विषय पोहोचला आहे. आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्हाला चिन्ह मिळालं पाहिजे, अशी मागणी आम्ही या याचिकेत केली आहे,’ असं प्रफुल पटेल म्हणाले.