दि.6:इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2021 क्रिकेट टूर्नामेंटमधील मॅचेसवर बेटिंग करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे. नगरसेवकाच्या मुलाला बेटिंग प्रकरणात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा मुलगा गिरीश याला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. गिरीश जेसवानी हा आयपीएलमधील दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यावर बेटिंग लावत होता. एका मोबाइल ॲपच्या सहाय्याने हे बेटिंग सुरू होतं.
उल्हासनगर क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांना बेटिंग प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले व्यक्ती हे क्रिकेट माझा या मोबाइल अॅपच्या माध्यमातून बेटिंग करत होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन मोबाइलसह इतरही काही सामान जप्त केले आहे.