मुंबई,दि.4: राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांनी खळबळजनक दावा केला आहे. नवाब मलिक यांचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे. भाजपाचा विरोध असूनही अजित पवारांनी मलिक यांना उमेदवारी दिली आहे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. परिस्थिती बदलत राहते. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात, असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. यावर आता काही बोलायचे नाही. महाविकास आघाडीमध्ये असतो तर अणुशक्ती नगरमधून तिकीट मिळाले नसते. अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या मदत केली, त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर आलो, एवढेच एक कारण आहे. अजित पवार आज भाजपाबरोबर असले तरी त्यांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही. तसेच मीदेखील माझी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचारधारा सोडलेली नाही, असे अजित पवार गटाचे नेते आणि उमेदवार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे आणि…
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे, असा मोठा दावा नवाब मलिकांनी केला. ते एका मुलाखतीत बोलत होते.
उमेदवारी जाहीर केल्यानंतर टीका होईल, याची कल्पना होती, तरीही त्यांनी उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे, असे सांगत नवाब मलिक यांनी काही मोठे दावे केले आहेत.