मुंबई, दि.२३: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ईडी चौकशी करण्यात आली आहे. अनेक नेत्यांची ईडी, सीबीआय चौकशी सुरू आहे. नवाब मलिक बुधवारी सकाळी या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी अगोदरच समन्स पाठवले होते. त्यानुसार आज नवाब मलिक (Nawab Malik) ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचे सांगितले जाते. मात्र, ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात नवाब मलिक यांनी चौकशी करत आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
नवाब मलिक सकाळी साधारण पावणेआठच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात झाल्याचे समजते. या चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवाब मलिक यांनी यापूर्वी अनेकदा ईडीचे अधिकारी आपल्या घरी छापा टाकणार असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही कारवाईचा सुगावा लागल्यानंतर नवाब मलिक त्याची जाहीरपणे वाच्यता करतात. परंतु, आज नवाब मलिक अचानकपणे ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या चौकशीसाठी नवाब मलिका यांना ईडीकडून अगोदरच समन्स पाठवले असावे, असा अंदाज आहे. तरीही नवाब मलिक आज अचानक ईडीच्या कार्यालयात का दाखल झाले असावेत, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.