नवी दिल्ली,दि.११: Nawab Malik Gets Interim Bail: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना तब्येतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना १३ जुलैला दणका देत, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज नाकारण्यात आला होता. त्यामुळे नवाब मलिक यांचा तुरूंगातील मुक्काम आणखी किती काळ वाढणार यावर चर्चा रंगल्या होत्या. पण अखेर, आज सर्वोच्च न्यायालयानेवैद्यकीय कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. (Nawab Malik Gets Interim Bail)
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर | Nawab Malik Gets Interim Bail
याआधी मलिक यांनी कनिष्ठ न्यायालयात या संदर्भातील जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यावेळीही त्यांना जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. पण सर्वोच्च न्यायालयात आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय चाचणी दरम्यान त्यांची १ किडनी निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा अंतरिम मिळाल्याचे म्हटले जात आहे.
हायकोर्टाने अर्ज फेटाळत असताना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दिलेला निर्णय योग्य ठरवला होता. नवाब मलिक यांनी कोर्टाकडून वैद्यकीय उपचारासाठी विशेष जामीन अर्ज केला होता. पण सध्या मलिक त्यांनी निवडलेल्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारात तपास यंत्रणांनी कुठेही आडकाठी केलेली नाही. त्यांच्यावरील उपचार व वैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत असताना कोणतीही मनाई केलेली नाही. त्यामुळे PMLA च्या आरोपातील आरोपीला जामीन देणं चूक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यावर कोर्टाकडून मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढवण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. पण आज अखेर त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला.