नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्तांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओवर दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.26: राणा दांपत्याचा व्हिडीओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट केला असून यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा यांनी एकीकडे पोलिसांनी पाणीदेखील दिलं नसल्याचा आरोप केला असताना संजय पांडे यांनी या व्हिडीओतून त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला होता. यानंतर संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यात बसून चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं. मात्र आता नवनीत राणा यांच्या वतीने त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. तसंच मला बाथरुम वापरण्याची परवानगीदेखील दिली नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट करत आरोप फेटाळून लावले.

व्हिडीओत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करताना आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का? अशी विचारणा केली आहे.

वकिलांचं स्पष्टीकरण –

वकील रिझवान मर्चंट यांनी नवनीत राणांनी केलेल्या विनंतीनंतर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत ते सांगत आहेत की, “माझ्या आशिलाने केलेल्या विनंतीनंतर हा व्हिडीओ तयार करत असून त्यांच्या वतीने ही वक्तव्यं करत आहे. एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नवनीत राणा यांनी अटकेत असताना पोलिसांकडून मुलभूत सुविधा मिळाली नसल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हे ट्वीट केलं आहे. मला फक्त हे स्पष्ट करायचं आहे की, अटक केल्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये असतानाचा व्हिडीओ संजय पांडे यांनी ट्वीट केला आहे. तिथे अधिकाऱ्यांनी चहासाठी विचारलं होतं, याबद्दल काही म्हणणं नाही”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “पण ते रात्री १ वाजेपर्यंत खार पोलीस स्टेशनमध्ये होते. नंतर त्यांना सांताक्रूझमधील जेलमध्ये पाठवण्यात आलं. रात्रभर आणि कोर्टात हजर करेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा यांनी केलेले आरोप खार पोलीस ठाण्यात होते तेव्हाचे नसून सांताक्रूझमधील जेलमध्ये असताना मिळालेल्या वागणुकीबद्दल आहेत”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here